औरंगाबाद :- महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवणारे अशोक सायन्ना यादव यांनी अवघ्या तीन हजारात निवडणूक लढविली आणि जिंकली. विशेष म्हणजे पडेगाव ते रेल्वे स्टेशन या वार्ड प्रवासासाठी त्यांचे निम्मे पैसे खर्च झाले होते. तर अपक्ष उमेदवार इक्बाल सिंग गिल यांनी अपक्ष लढत आठ हजारांत निवडणूक जिंकली. आजच्या उमेदवारांची तुलना तर खर्चाच्या आकड्यांनी डोळे वविस्फारतील !
औरंगाबाद महानगरपालिकेची पहिली निवडणूक 1988 ला झाली त्या वेळच्या नगरसेवकांना आजच्या निवडणुकीबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पडेगावात शेती, दुग्ध व्यवसाय करणार्या अशोक सायन्ना यादव यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. रेल्वेस्थानक परिसरातल्या वॉर्डातून त्यांना उमेदवारी मिळाली. ते म्हणाले, त्यावेळी एवढी वाहने नव्हती. त्यामुळे त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागे. पडेगाव ते रेल्वेस्टेशन असा दररोज त्यांचा प्रवास सुरू असे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मतदारांना सोबत बैठका असे सत्र सुरू झाले. त्यावेळी कार्यकर्तेही कधी पैसे मागत नव्हते तर मतदारही याबाबत कधीही बोलत नव्हते. तो काळ अतिशय प्रामाणिकपणाचा होता. मी त्यावेळी निवडणुकीत तीन हजार रुपये खर्च केले होते. मतदारांनी भरभरून मते देऊन मला विजयी केले. या 3 हजारांपैकी माझे निम्मे पैसे पडेगाव ते रेल्वे स्टेशन या प्रवासावर खर्च झाले. हेही ही नमूद करावेसे वाटते. आजचा विचार केला तर उमेदवारांच्या खर्चाचे आकडे चकित करणारेच आहेत. बेगमपुरा भागातून अपक्ष उमेदवारी दाखल करीत विजयश्री मिळविणारे इक्बालसिंग गिल सांगतात, शहरात नगरपालिका असल्यापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता. 1978 पासून राजकारणात आहे. त्यावेळी अब्दुल अजीम, एसपी प्रधान अशी स्थानिक मंडळी राजकारणात होती. राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे शहरावर विशेष लक्ष होते. खा. बाळासाहेब पवार, आमदार अमानुल्ला मोतीवाला यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे काम चाले. खासदार बाळासाहेब पवार यांनी मनपा निवडणुकीची जबाबदारी घेतली. मला पक्षाचे टिकीट मिळाले नाही म्हणून खासदार पवारही नाराज झाले. मी उमेदवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचार सुरू झाल्यानंतर अचानक पवारांची गाडी माझ्या समोर येऊन उभी ठाकली. तू काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहेस, नाराज होऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे. असे म्हणत निवडणुकीसाठी खर्च माझ्या हातात ठेवला. अन चमत्कार झाला अपक्ष म्हणून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. त्यावेळी कुणी पार्टी मागत नव्हते तर खर्चायला पैसे द्या अशीही अर्जव करीत नव्हते. आश्वासन दिले म्हणजे ते पाळलेच जायचे. जातवार नेतेमंडळीही तेव्हा नव्हती. मी एकटा सिंग असूनही सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान दिले. शहरात जात वार नेतेमंडळी नव्हती. काम करणार्याला लोक महत्त्व देत होते. आजची परिस्थिती बदललेली आहे. राजकारण धोकेबाजी आणि गटबाजी यात विभागले गेले. राजकीय पक्ष चमचेगिरी करणार्या नेत्यांच्या पाठीशी उभा ठाकल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांचा गळा घोटला जातोय. मेहनत घेणारे कार्यकर्ते दूरच राहतात अन इतरांनाच मानसन्मान मिळतो हे दुर्दैव आहे.